हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाही सरकारने हिंगोली आणि सेनगाव तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. या निषेधार्थ सेनगाव तहसील कार्यालयात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकून सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात पाच तालुक्यांपैकी केवळ तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आल्याने, उर्वरित दोन तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहनार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि सेनगाव तालुक्यांचा तातडीने अतिवृष्टीग्रस्त योजनेत समावेश करावा आणि जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करावा, अशी ठाम मागणी केली आहे. सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे
Heavy rain flood-affected
