नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तब्बल 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजनांचा शुभारंभ केला. यामध्ये ‘डाळी स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन धन कृषी योजना’ या दोन योजना समाविष्ट आहेत.
हा कार्यक्रम समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी मोदींनी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ५,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच ८१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.
डाळी स्वावलंबन अभियान साठी 11,440 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, 2030-31 पर्यंत देशातील डाळींचे उत्पादन 252.38 लाख टनांवरून 350 लाख टनांपर्यंत वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे उद्दिष्ट आहे. तर पंतप्रधान धन धन कृषी योजना साठी 24,000 कोटी रुपये खर्च होणार असून, याअंतर्गत कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण, शाश्वत शेती पद्धती आणि सिंचन व साठवण सुविधा सुधारणा यावर भर दिला जाईल.
पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली आणि PACS संस्थांचे रूपांतर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (PMKSK) तसेच सामान्य सेवा केंद्रे (CSC) मध्ये करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये (FPOs) 50 लाख शेतकऱ्यांना सदस्यत्व दिल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, राजीव रंजन सिंह आणि भागीरथ चौधरी उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi, Farmers, Agriculture,Schemes
