मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांना तब्येत बिघडल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी राऊत यांनी याच रुग्णालयात नियमित रक्त तपासणी केली होती. आज सकाळी अस्वस्थ वाटल्याने त्यांना तातडीने फोर्टिसमध्ये नेण्यात आले. डॉक्टर त्यांची प्रकृती बारकाईने तपासत असून लवकरच अधिकृत अहवाल दिला जाण्याची शक्यता आहे.
सकाळीच घेतली होती पत्रकार परिषद
विशेष म्हणजे, आज सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीबाबत भाष्य करत, “राज ठाकरे यांची इच्छा आहे की काँग्रेसलाही सोबत घेणे आवश्यक आहे,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधांमध्ये उब दिसून येत आहे, आणि या जवळिकीमध्ये संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.
शिवसेनेची ‘धडाडणारी तोफ’
संजय राऊत हे शिवसेना (ठाकरे गट) चे प्रभावी आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी सातत्याने ठाकरे गटाची भूमिका ठामपणे मांडली आहे. विरोधकांवर तीव्र टीका करणे आणि पक्षाच्या भूमिकेचे भक्कम समर्थन करणे ही त्यांची ओळख बनली आहे.
दररोज घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांमधून ते सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत असतात, आणि त्यांच्या वक्तव्यांचा प्रतिवाद करण्यासाठी विरोधकांना मोठी फौज उभी करावी लागते.
राऊत यांच्या प्रकृतीकडे राज्याचे लक्ष
संजय राऊत यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात काळजीचे वातावरण आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात असून, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन येण्याची प्रतीक्षा आहे.
Sanjay Raut
