‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांची मिश्कील टिप्पणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर मिश्कील शैलीत प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर उपरोधिक भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचा आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवलं जातं. आम्ही गमतीने म्हणतो की, आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलं आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आम्हाला कमोडिटी करून ठेवले आहे. हे दुर्दैवी आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार इंटरनॅशनल करा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचंही सांगा. आमच्यावर विनोद केले जात आहेत, हे दु:खद आहे.”

त्यांच्या या मिश्कील वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, सातत्याने सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांबाबत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर-3’ ची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नव्या राजकीय रणनीतीवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याआधी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आता ठाकरे गटासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित लोकप्रतिनिधींशी सातत्याने गुप्त बैठका आणि संपर्क सुरू असून, आगामी काळात आणखी काही राजकीय घडामोडी घडू शकतात. शिंदे गटातील सूत्रांचा दावा आहे की, ठाकरे गटातील काही आमदारांचे मतपरिवर्तन झाले असून पक्षांतरबंदी कायद्याच्या अटी पूर्ण करण्यासाठी आणखी काही आमदारांना आपल्या बाजूने आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तथापि, या सर्व हालचालींबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व घडामोडी राजकीय चर्चांपुरत्याच मर्यादित असून, पुढील काळात नेमके काय घडते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted