महापौरांशी उद्धट वर्तन; मनपा आयुक्तांकडून डॉक्टर निलंबित

लातूर : महापौर जयश्री सोनकांबळे यांच्याशी उद्धटपणे वर्तन केल्याप्रकरणी अवंती नगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. वर्षा कंधारे यांना मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी तात्काळ निलंबित केले आहे.

महापौर जयश्री सोनकांबळे यांनी गुरुवारी अवंती नगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी तपासणीदरम्यान उपस्थित असलेल्या डॉ. वर्षा कंधारे यांनी महापौरांशी उद्धटपणे वर्तन करत अयोग्य पद्धतीने उत्तरे दिल्याची बाब समोर आली.

लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन तसेच शासकीय शिस्तीचा भंग झाल्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली. त्यानुसार मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी डॉ. वर्षा कंधारे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही या कारवाईला दुजोरा दिला आहे. शासकीय कामकाजात बेजबाबदारपणा, शिस्तभंग आणि उद्धट वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. शंकर भारती यांनी संबंधित डॉक्टराच्या निलंबनास दुजोरा देत आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted