टी-20 विश्वचषकाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असताना पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) लक्ष पाकिस्तानकडे केंद्रित झाले असून, पुढील 48 तासांत आयसीसीकडून तातडीची उच्चस्तरीय बोर्ड बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या बैठकीत पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर सविस्तर चर्चा होणार आहे. आयसीसीकडून पाकिस्तानवर आर्थिक दंडासह कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही अहवालांनुसार, पाकिस्तान संघाला संपूर्ण विश्वचषकातूनच बाहेर काढण्याचा पर्यायही चर्चेत आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तान सुपर लीगवर (PSL) होऊ शकतो. परदेशी खेळाडूंना लीगमध्ये सहभागी होण्यासाठी मिळणाऱ्या NOC (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) वर निर्बंध येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लीगचे भविष्यही धोक्यात येऊ शकते.
या संपूर्ण वादाची सुरुवात बांगलादेशपासून झाली. खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होण्यास नकार दिला होता. आयसीसीसोबत अनेक बैठकांनंतरही बांगलादेशने आपली भूमिका बदलली नाही. अखेर आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला विश्वचषकात संधी दिली.
या प्रकरणात बांगलादेशच्या बाजूने उभा राहणारा पाकिस्तान हा एकमेव देश ठरला. त्यामुळे आता आयसीसी पाकिस्तानविरोधात कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
