लातूर : काँग्रेसने निवडणूकीपूर्वी आघाडी करून विजयासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले. निवडणूकीत अपेक्षित लाभ पदरात पडल्यानंतर मात्र वंचितला बाजूला सारल्याचे दिसून आले. यामुळेच महापौर पदासाठी वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडीने आपली उमेदवारी कायम ठेवली तर भाजपा वंचित बहुजन आघाडीच्या महापौर व उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांना पाठींबा देईल, अशी माहिती भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
लातूर मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. एका बाजूने काँग्रेस आघाडी आणि दुसºया बाजुने भाजपा अशी लढत झाली. वंचितच्या साथीमुळे पराभवाच्या छायेत असणारी काँग्रेस निवडणुकीनंतर बहुमतात आल्याचे दिसून आले. भाजपाने निवडणुकीत जोरदार लढत दिली. निवडणुकीनंतर जनतेने दिलेला कौल भाजपाने मान्य केला.
निवडणुकीनंतर निर्माण झालेले चित्र पाहता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा वापर केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर व उपमहापौर निवडताना वंचित बहुजन आघाडीलाही समान वाटा मिळणे अपेक्षित होते. परंतु तो मिळाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. यातून आघाडीला मतदान केलेल्या मतदारांचाही अवमान झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेवून वंचित बहुजन आघाडीने महापौर पदासाठी निकिता रोहीत सोमवंशी तर उपमहापौर पदासाठी सचिन अर्जुनराव गायकवाड यांची उमेदवारी दाखल केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने सदर निवडणुक लभविण्याची भूमिका कायम ठेवत आपले उमेदवार माघारी घेतले नाहीत तर भाजपा वंचित बहुजन आघाडीला मतदानाच्या वेळी पाठींबा देईल, अशी माहिती भाजपा निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
