राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झाले आहे. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आज शुक्रवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला, तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. प्रथमच एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळत असल्यास ती नक्कीच स्वागतार्ह बाब असल्याचं त्यांनी म्हटलं.
मात्र उपमुख्यमंत्री पदावर कोणाची निवड करायची, हा निर्णय संबंधित पक्षाने घ्यावा, असं स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्या नावावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे.
