संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ मधून अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रवर्गात मंत्री अतुल सावे यांचे खंदे समर्थक असलेले श्रीकांत घुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत असलेले आणि मागील ६ वर्षांपासून प्रभाग स्तरावर प्रभावी काम करणारे श्रीकांत घुले यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. मतदान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात असंतोष व्यक्त केला होता.
या नाराजीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत घुले यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पूर्व मतदारसंघातील जयभवानी भागातील मोठा युवक वर्ग तसेच नागरिकांचा भक्कम पाठिंबा श्रीकांत घुले यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या राजकीय घडामोडीमुळे संबंधित पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत किती आणि कसा फटका बसेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुढील काळात हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
