लातूर: दि. 09 जुलै 2026 रोजी पहाटे 01:37, 02:15, 02:17 व 03:23 वाजता हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अधिकृत नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.6, 3.6, 3.9 व 4.1 रिश्टर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू शिरली तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे होता. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. हिंगोली येथे झालेल्या भूकंपाचे सौम्य धक्के लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी (लातूर शहर, निलंगा) जाणवले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. तथापि प्राथमिक माहितीनुसार कसलीही जीवितहानी किंवा वित्तहानीची नोंद नाही, अशी माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागेत जावे, विशेषत कच्चे बांधकाम, (दगड मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
