नागपूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आज नागपूरमध्ये ओबीसी समाजाकडून भव्य सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. राज्यातील पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून तब्बल ६० हजारांहून अधिक ओबीसी बांधव नागपुरात दाखल झाले असून शहरात “पिवळे वादळ” उसळल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत मोर्चा
या महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून झाली आणि संविधान चौकात समारोप करण्यात आला. संविधान चौकात सामाजिक जागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून आलेल्या ओबीसी प्रतिनिधींनी आपला निषेध नोंदवला. मोर्चात एक हजाराहून अधिक बसेस आणि पाच हजाराहून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाल्याने नागपूर शहरात वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, हैदराबाद संस्थानाच्या गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पारंपरिक ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यांचा आरोप आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे.
शासन निर्णयातील बदलांवर आक्षेप
ओबीसी संघटनांनी शासन निर्णयातील काही बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सुरुवातीला ‘पात्र’ हा शब्द GR मध्ये होता; म्हणजे काही निकष पूर्ण केल्यावरच प्रमाणपत्र मिळणार होते. परंतु काही दिवसांत हा शब्द वगळण्यात आला. तसेच ‘नातेवाईक’ या शब्दाऐवजी ‘नातेसंबंध’ हा शब्द वापरला गेला आहे. त्यामुळे मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास, फक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून इतरांनाही प्रमाणपत्र मिळू शकते. ओबीसी संघटनांचा दावा आहे की हे सामूहिक पुरावे वैयक्तिक पुराव्यांच्या स्वरूपात ग्राह्य धरता येणार नाहीत, आणि त्यामुळे हा निर्णय न्यायालयीन कसोटीवर टिकू शकणार नाही.
Nagpur OBC Protest
