आज शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळासाहेबांविषयी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.
मनसेकडून जारी केलेल्या संदेशात बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनावर पडलेला प्रभाव याची भावना व्यक्त करण्यात आली. पक्षाकडून सांगण्यात आले की, भाषिक अस्मितेवर आधारित मोठी जनचळवळ उभी करून तिच्यातून राजकीय पक्षाला जन्म देणारे नेतृत्व हे बाळासाहेबांचेच. समाजकारणाला प्रथम प्राधान्य देऊन नंतर राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही त्यांनी रुजवला.
मनसेने नमूद केले की, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विषय कधीही केवळ ‘व्होटबँक’ म्हणून हाताळला नाही. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हे अस्मितेचे आणि धर्माप्रतीच्या निष्ठेचे प्रतीक होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या तर्कवादाची परंपरा त्यांनी पुढे नेत, चिकित्सक दृष्टी सोडली नाही, यावरही मनसेने भर दिला.
संदेशात असा उल्लेखही आहे की, “बाळासाहेबांच्या प्रतिमेचा आधार घेत स्वतःला हिंदुत्वाचे वारसदार म्हणवणाऱ्यांना ना बाळासाहेबांची जाण आहे, ना प्रबोधनकारांच्या विचारांची.” बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा किती समृद्ध होता, हे आजच्या राजकारणात अनेकांना कळत नाही, अशी टीकाही त्यात करण्यात आली.
“फक्त सत्ता मिळवणे आणि ती उपभोगणे हे राजकारण नसून, समाजकारणाला प्राधान्य देण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली,” अशा शब्दांत मनसेने आपल्या श्रद्धांजलीचा समारोप केला.
