मुंबई महापौरपदाचा तिढा अखेर सुटला; फडणवीस–शिंदे यांच्यात अंतिम निर्णय

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापौरपदाचा तिढा आता सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेतील महापौरपद, स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांवरील पदवाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतिम निर्णय झाल्याचं समजतं.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांचे नगरसेवक कोकण भवन येथे जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवरही फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचं कळतं.

मुंबई महापौरपदासाठी चार नावे चर्चेत

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाला असला, तरी भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेला स्वतंत्र बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येत हालचालींना वेग दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापौरपदासाठी राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि योगिता कोळी ही चार नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच या नावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महापौर निवडणुकीसाठी आयुक्त भूषण गगराणी पीठासीन अधिकारी

मुंबई महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन महापौराची निवड पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच होणार आहे.

मागील महापालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे ‘मावळते महापौर’ ही संकल्पना लागू होत नाही. याआधी जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकत होता. त्या नियमानुसार ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना हा अधिकार होता. मात्र तो अधिकार काढून घेऊन प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.

Mumbai Mayor Election

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments