लातूर जिल्ह्यात अवैध सावकारांविरुद्ध विशेष मोहीम; नागरिकांनी तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

लातूर : लातूर जिल्ह्यांतर्गत अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, मनिलेंडर्स आणि फायनान्स संस्थांविरुद्ध लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील अवैध सावकारीबाबत प्रसारीत झालेल्या बातमीची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी ४ जुलै २०२६ रोजी स्वतः नणंद येथे जाऊन संबंधित व्यक्तींची भेट घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या प्रकरणी त्यांनी निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना त्वरित आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जर कोणताही परवानाधारक किंवा विनापरवाना सावकार बेकायदेशीररीत्या जादा व्याज आकारत असेल, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर, मालमत्तेची किंवा इतर मौल्यवान कागदपत्रे तारण म्हणून बळजबरीने लिहून घेत असेल, अथवा धमकी, दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून कर्जदाराचा छळ करत असेल, तर अशा प्रकरणांची माहिती नागरिकांनी कोणतीही भीती किंवा दबावाला बळी न पडता प्रशासनाला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यास तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.

तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, पावत्या, धनादेश, स्टॅम्प पेपर, करारपत्रांच्या प्रती तसेच मोबाईल संदेश, ऑडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्रे किंवा व्हिडिओ यांसारखे उपलब्ध पुरावे सादर करावेत. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून संबंधित कायद्यांनुसार योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल आणि कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रारदाराची ओळखही शक्य त्या मर्यादेत पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

नागरिकांना या संदर्भात आपली तक्रार जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, शिवाजी चौक, लातूर येथे किंवा संबंधित तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका कार्यालय येथे नोंदवता येईल. तसेच अधिक माहिती किंवा संपर्कासाठी ०२३८२-२४५१९३ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधून नागरिकांनी अवैध सावकारी विरोधी मोहिमेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted