लातूर : पोलिओ लसीकरणामुळे लहान बालकांचे आरोग्य सुरक्षित राहते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाच वर्षांच्या आतील प्रत्येक बालकाला पोलिओ लस देऊन त्यांचे आरोग्य अबाधित ठेवावे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जाधव, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लहान मुले हे देशाचे भविष्य असल्याचे सांगून, जिल्ह्यातील सर्व पालकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ लस पाजून आरोग्य विभागाच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.
