चालकांनो लक्ष द्या! १६ ऑगस्टपासून टॅक्सी, रिक्षा, बस चालकांसाठी मराठी बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे. रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे महाराष्ट्राने नेहमीच खुले मनाने स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकीदेखील आहे.

हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबविली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted